उध्दव फंगाळ
मेहकर : कधी काळी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहकर उपविभागामध्ये सरत्या वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याचे वास्तव समोर आले आहे. मेहकर पोलीस उपविभागात येणाऱ्या पाच पोलीस स्टेशन अंतर्गत वर्षभरामध्ये खून सहा, बलात्कार १०, दरोडा तीन ठिकाणी घटना घडल्या असून, घरफोड्या, चोरी, विनयभंग, रस्ते वाटमारी सारख्या गुन्ह्यांचे प्रमाणही गतवर्षीपेक्षा कमी झाल्याने मेहकर उपविभागात पोलीसांचा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर उपविभाग काही काळापासून मोठ-मोठ्या गुन्ह्यांमध्ये समोरच राहत असल्याने या उपविभागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. त्यामुळे मेहकर उपविभागाची एक संवेदनशील भाग म्हणूनच ओळख निर्माण झालेली आहे. मेहकर पोलीस उपविभागाअंतर्गत येणाºया मेहकर, डोणगांव, जानेफळ, लोणार, साखरखेर्डा, या पाच पोलीस स्टेशनचा कारभार मेहकरच्या उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत चालतो. या पाचही पोलीस स्टेशन अंतर्गत २०१६ मध्ये खून, बलात्कार, दरोडा, घरफोड्या, चोरी, विनयभंग, रस्ते वाटमारी सारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. २०१७ मध्ये मात्र विविध गुन्ह्याच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर सतत नियंत्रय ठेवले. तसेच नागरीकांमध्ये गुन्हेगारीसंदर्भात असलेली जागरुकता यामुळे यावर्षी गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात पोलीसांना यश आले आहे. सन २०१६ मध्ये मेहकर, डोणगांव, जानेफळ, लोणार, साखरखेर्डा, या पाच पोलीस स्टेशन अंतर्गत खून ११, बलात्कार १२, दरोडा ०२, घरेफोड्या ११, चोरी १०१, विनयभंग ४५ आणि रस्ते वाटमारी ५३, याप्रमाणे गुन्हे दाखल झाले होते. तर २०१७ मध्ये यासर्व गुन्ह्यांचे आकडे खाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मेहकर उपविभागात पोलीसांचा वचक निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
वर्षभरातील गुन्हे
सन २०१७ या वर्षभरामध्ये मेहकर, डोणगांव, जानेफळ, लोणार, साखरखेर्डा या पाचही पोलीस स्टेशन अंतर्गत खून सहा, बलात्कार १०, दरोडा तीन, घरेफोड्या १७, चोरी ८५, विनयभंग ४३, रस्ते वाटमारी ३५ या प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा चालुवर्षामध्ये पोलीसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे.