यासंदर्भात स्वत: जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून बुलडाणा शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या १९ वर्षांपासून जिजामाता सहकारी साखर कारखाना हा अवसायनात गेला आहे. त्यातील कामगारांचीही देणीही थकलेली आहेत. यासंदर्भात काही प्रकरणे न्यायप्रविष्टही होती. त्यातील एका प्रकरणाच्या निकालानुसार कामगारांना त्यांची थकीत देणी देण्यात यावीत, या मागणीसाठी दुसरबीड येथील या साखर कारखान्यातील कामगारांनी १५ फेब्रुवारीपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रात्रीही त्यांनी कार्यालय परिसरातच ठिय्या दिला होता.
दरम्यान, मंगळवारी कामगारांची व कारखान्याचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्यामध्ये चर्चा चालू असताना त्यांना धक्काबुकी झाल्याने त्यांनी थेट पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचे सहकारी राजन चौधरी, उत्तम जाधव, विनायक देशमुख, दिलीप कटारे यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्याही जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालय परिसरात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिलेला आहे. या ठिकाणी पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला आहे.
दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखाना बंद पडल्यानंतर जवळपास ४५० ते ५०० कामगारांची देणी रखडली आहेत. साखर कारखान्याची विक्री होऊनही कामगारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. याविषयी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही त्यांना केवळ आश्वासनेच मिळत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे.