लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे परवानगी नसताना सैलानी बाबांचा संदल काढण्यात आला. त्यामुळे सैलानी बाबा दर्गा परिसरात गर्दी होऊन कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रायपूर पोलीसांनी ३ एप्रिल रोजी ही कारवाई केली आहे. यामध्ये ११ स्थानिक नागरिक व एक हजार अज्ञात भाविकांवर गुन्हे दाखल आहेत. तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाचा संदल २ एप्रिलला रात्री काढण्यात आला. प्रशासनाची परवानगी नसताना पिंपळगाव सराई गावातून संदल काढल्यामुळे भाविकांची गर्दी झाली. त्यामुळे शासनाच्या नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या तक्रारीवरून रायपुर पोलीस स्टेशनमध्ये १ हजार ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आरोपी शेख रफिक शेख करीम, शेख शफीक शेख करीम हाजी हाशम शेख हबीब शेख नजीर शेख कासम शेख चांद शेख हबीब शेख कदीर शेख नईम शेख असलम शेख जहीर शेख राजू शेख शहजाद यांच्यासह एक हजार अज्ञात व्यक्तींविरुद्ध रायपूर पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१, महाराष्ट्र कोविड १९ चे नियम ११ तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बुलडाणा पोलीस अधीक्षक चावरीया, रायपूर ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे हे करीत आहेत.
१० मुजावर यांनी चढविला सैलानी बाबांचा संदलपिंपळगाव सराई: सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांचा संदल २ मार्च रोजी रात्री पिंपळगाव सराई येथील संदल घरात १० मुजावर यांच्या हस्ते दहा मिनिटांची पूजा करून चढविण्यात आला. नेहमीप्रमाणे गांधीच्या रस्त्याने जाणारा संदल मार्ग बदलून पिंपळगाव सैलानी राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याने चारचाकी वाहनाने संदल घेऊन मुजावर यांनी रात्री आठ वाजेच्या दरम्यान सैलानी बाबांच्या समाधीवर संदल चढविला. दरवर्षी सैलानी बाबांचा संदल पिंपळगाव सराई गावातून पालखीची मिरवणूक काढून जंगलातील काटेरी रस्त्याने संदल सैलानी दर्गावर जात असतो, परंतु कोरोनामुळे यावर्षी त्या रस्त्याने संदल न जाता पिंपळगाव सराई सैलानी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याने संदल गेला. जुन्या फांदीच्या रस्त्याने बरेच भाविक संदलची प्रतीक्षा करीत होते. भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी दुसऱ्या मार्गाने संदल काढण्यात आला. भाविकांना संदल सैलानी दर्गावर आल्याची माहिती मिळताच भाविकांनी सैलानी दर्गाच्या ठिकाणी गर्दी केली होती. भाविकांना हटवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. यावेळी अनेक भाविक सैलानी दर्गा परिसरात शिरले. मुजावर परिवाराच्यावतीने शेख रफिक मुजावर, पंचायत समिती सदस्य चांद मुजावर, नईम मुजावर रशीद मुजावर, जहीर मुजावर, राजू मुजावर यांच्यासह तहसीलदार रुपेश खंडारे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधाळ, योंगेंद्र मोरे, सरपंच प्रदीप गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.