शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकतर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नाही, दुसरीकडे कर्ज काढून उसने पैसे घेऊन पेरणी केली, तर असेच आभाळाची उष्णता व कोरडे वारे वाहत राहिले तर काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
हवामान खात्यावर शेतकऱ्यांचा रोष
यंदा राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; परंतु परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नाही. हवामान खात्याचा अंदाज पुन्हा फोल ठरल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
१२ दिवसांपासून पाऊसच नाही
पावसाअभावी पिके सुकू लागली,
यावर्षी खरीप हंगाम लागताच शेतकरी वर्गाला पेरणी करण्यासाठी पाहिजे तसा पाऊस झाला नाही. पंधरा दिवसांत दोन वेळेस पाऊस झाल्याने शेतकऱ्याने मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस लागवड केली, पण बारा दिवस झाले पावसाचा पत्ता नाही.
या भागातील पिके धोक्यात
सिदंखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी, शेलगाव राऊत, पिंपळगाव लेंडी, पांगरी, उमरद, विजोरा, साठेगाव, हिवरखेड पूर्णा, राहेरी बु., राहुरी खुर्द, दुसरबीड, जऊळका वाघजाई या परिसरात पावसाने दांडी दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. उष्ण तापमानाने सोयाबीन व कापूस पीक जळण्याची भीती आहे.
काय म्हणतात शेतकरी...
जून महिन्यात शेवटी आमच्या भागात एकदाच पाऊस झाला. त्यानंतर आज १२ ते १३ दिवस झाले पाऊसच नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
एकनाथराव देशमुख,
राहेरी बु. शेतकरी.
पाऊस नसल्यामुळे राहेरी, ताडशिवणी परिसरात पेरणी धोक्यात सापडली आहे. जमिनीतून अंकुरच वर आले नाही. आम्हाला दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही. तरी आम्हाला शासनाने बियाणे उपलब्ध करून द्यावे.
शेषराव देशमुख, ताडशिवणी शेतकरी.