खामगाव : तब्बल एक महिना पावसाचा खंड पडल्याने कपाशीच्या उत्पादनात घट येणार आहे. या संकटातून वाचलेल्या कपाशीवर आता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे.
जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ५६० हेक्टर असून, १ लाख ९४ हजार ९२९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभाग व शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी कपाशीच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, ज्या शेतांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे, अशा कपाशीवर सध्या फुले पात्या व लहान बोंडे आहेत. त्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव निदर्शनास आला आहे.
कपाशीच्या शेतामध्ये फुले उमललेल्या अवस्थेत किंवा डोमकळीसदृश अवस्थेत होती, अशा प्रत्येक फुलात गुलाबी बोंड अळी आढळून आली असून फूल अलगदपणे निघून येत आहे. ती फुले काढून बघितली असता गुलाबी बोंडअळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलामधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आलेली आहे. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सद्य:स्थितीत ५ ते १० टक्के आढळून आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे, त्यांनी देखील निरीक्षण करणे गरजेचे आहे, असा प्रादुर्भाव इतरही भागांत फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता आहे.