बुलडाणा : ऑनलाईन शिक्षणाशी मुले फारशी परिचित नव्हती. परंतु, कोरोनाच्या संकटाचे शिक्षण विभागाने संधीत रुपांतर केल्याने गोरगरीब मुलेही आता ग्लोबल शिक्षणाशी जोडली गेली आहेत. सरत्या वर्षामध्ये जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ई-लर्निंग पोहोचले. या ऑनलाईन शिक्षणाचे नववर्षातही चांगले सकारात्मक परिणाम समोर येणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. सन २०२०-२१ या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये दरवर्षीप्रमाणे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. परंतु, शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक सत्र ऑनलाईन सुरू करण्यात आले. सुरूवातीच्या काळात ऑनलाईन शिक्षणात मोठ्या अडचणी आल्या. मुलांसोबत शिक्षकांनाही ऑनलाईन अभ्यास नवीनच होता. परंतु, हळूहळू ऑनलाईन शिक्षणाची पाळेमुळे गावागावात घट्ट होत गेली. इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनीच ऑनलाईन शिक्षण घेणे सुरू केले. ऑनलाईन शिक्षणासाठी बहुतांश विद्यार्थ्यांकडून मोबाईलचाच वापर होत आहे. त्यामुळे २०२०मध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षणाची एक नवी संधी निर्माण झाली. त्या संधीचा पुरेपूर उपयोग शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी करुन घेतल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक शाळांकडून होमवर्कही ऑनलाईन दिला जात आहे. काहींनी तर थेट व्हॉट्सअप ग्रुप तयार करून होमवर्क देणे सुरू केले आहे. या आनलाईन शिक्षणाचा भविष्यात विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होणार आहे.
९२ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले शिक्षण
टी. व्ही. केबल, स्मार्टफोनद्वारे, स्वयंसेवकांमार्फत व इतर माध्यमांद्वारे ९१.७२ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले. जिल्ह्यातील एकूण ४ लाख १ हजार २२२ विद्याथी सर्व माध्यमांद्वारे शिक्षण घेत आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील ३७ हजार २७७, चिखलीतील ४८ हजार ७८३, देऊळगाव राजातील २२ हजार ३६६, सिंदेखड राजातील ३१ हजार ९५, लोणारमधील ३१ हजार १९९, मेहकरमधील ४६ हजार १३४, खामगावमधील ६० हजार ९६८, शेगावमधील २८ हजार ४४४, संग्रामपूरमधील १४ हजार १४७, जळगावमधील २७ हजार ६०६, नांदुरातील १४ हजार ६०२, मलकापुरातील १० हजार ८८४, मोताळा तालुक्यातील २८ हजार ११८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ऑनलाईनसह इतर सर्व माध्यमांद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९१.७२ टक्के आहे. कोरोना संकटामुळे आलेला ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय भविष्यात उपायोगी ठरणार आहे.
उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी, बुलडाणा.
एकूण विद्यार्थी संख्या : ४,३७,४२४
टी. व्ही., केबलद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी : १,४८,५४१
स्मार्टफोनद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी : १,८७,४६३
स्वयंसेवकामार्फत : ११,११९
इतर माध्यमांद्वारे: ५४,०९९