- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकिय योजना म्हटले की, लाभासाठी अर्जांचा खच पडतो. कुणाची निवड करावी हे ठरवितांना प्रशासनाच्या नाकी नऊ येतात. मात्र 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेच्या बाबतीत याउलट चित्र आहे. गतवर्षी या योजनेसाठी जिल्ह्यात केवळ ४२ लाभार्थी पात्र ठरले. योजनेसाठीचे निकष 'भाग्यश्री'च्या वाटेत अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.मागील दोन वर्षांपासून शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री' योजना अंमलात आणली. स्त्रीभ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढावा हा या योजनेचा उद्देश आहे. आॅगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे बँकेत ५० हजार रुपये मुदतठेव म्हणून गुंतविण्यात येते. तर दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावे २५ हजार रुपये गुंतविण्यात येतात. एक मुलगी किंवा २ मुली असलेल्या महिलेने किंवा कुटूंब प्रमुखाने नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षाच्या आत ही शस्त्रक्रिया केलेली पाहिजे. अशी पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.एक किंवा दोन अपत्ये असणारी अनेक कुटूंब आपल्याकडे आहेत. परंतू त्यांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असतेच असे नाही. बºयाचदा माता-पित्यापैकी एकाने शस्त्रक्रिया केलेलीही असते. परंतू मुलगी जन्मल्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त कालवधीनंतर ही शस्त्रक्रिया झालेली असते. त्यामुळे ते दाम्पत्य या योजनेसाठी पात्र ठरत नाही. अशा कारणांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून योजनेची जनजागृती करण्याची गरज आहे.जनजागृतीच्या माध्यमातून योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ करून घेण्यास मदत होईल.
भाग्यश्री योजनेचे २०१७- १८ मध्ये १४ लाभार्थी होते. तर २०१८-१९ मध्ये हा आकडा ४२ आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होईल, यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे.- अरविंद रामरामेजिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण जि. प. बुलडाणा