लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे धाड परिसरात नदी- नाल्यांना पूर आला आहे. तसेच पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या शेतात सोयाबीन सोंगणीचे काम ठप्प पडले असून, शे तकरी शेतात सुडी लावून ताडपत्री टाकून संरक्षण करण्याचा प्रय त्न करीत आहेत; मात्र वातावरणातील गारव्यामुळे अनेक ठिकाणच्या सोयाबीन सुडीला अंकुर फुटण्याची शक्यता असून, शेतकर्यांना फटका बसणार आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ७८ हजार ३00 हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून, यावर्षी सुरुवा तीला अल्प पावसामुळे अनेक शेतकर्यांनी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीन सोंगणीवर आले असून, काही परिसरात कापणी करून मळणीसाठी सोयाबीनच्या गंज्या लावण्यात आल्या आहेत; मात्र जिल्ह्यात तीन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. पुढच्या आठवड्यात आलेल्या दिवाळी सणासाठी सोयाबीन सोंगणी करून बाजारात विक्रीसाठी नेण्याची तयार शेतकरी करीत होते; मात्र अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मंगळवारी दुपारी वादळी वार्यासह झालेल्या जोरदार पावसाने जिल्हय़ात नदी-नाल्यांना पूर आल्याने गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले.
ताडपत्री विक्रीत वाढजिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्यामुळे शेतात उभे असलेले तसेच सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होऊ नये म्हणून शेतकर्यांची कसरत सुरू आहे. घरात असलेली ताडपत्री किंवा प्लास्टिक कापड घेऊन शेतात धाव घेत आहे. त्यामुळे येथील आठवडी बाजारात ताडपत्रीच्या विक्रीत वाढ झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका ज्यारी किंवा का पसाला बसणार असून, कापासाची प्रतवारी खराब होण्याची चिन्हे आहेत.