मेहकर ते चिखली या महामार्गाचे नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. कंत्राटदाराने काम पूर्ण केले. या रस्त्याच्या बाजूला नाल्या काढण्यात आलेल्या नाहीत़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहत आहे. नाल्यांची व्यवस्था न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालात पाणी थांबून शेतमालाचे नुकसान होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे संबंधित कंत्राटदार यांना सोबत घेऊन लाेकप्रतिनिधींनी रस्त्याची पाहणी केली हाेती़, तसेच उपाययाेजना करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिली हाेती़ याकडे बांधकाम विभागाने व कंत्राटदाराने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शेतकरी अजूनही त्रास सहन करीत आहे.
पुलाखाली पडले खड्डे
लव्हाळा चौफुलीवर पुलाच्या खाली मोठमोठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यात पाणी साचत आहे. पाणी साचल्यामुळे वाहनचालकाला खड्डयाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात हाेत आहे़ खड्डयांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी हाेत आहेत़ या रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी लव्हाळ्याचे सरपंच दिनकर कंकाळ यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे़ आ. संजय रायमुलकर यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना या घटनास्थळाचीसुद्धा पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत हे काम तत्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.