दुसरबीड : परिसरात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांकडून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
दुसरबीड परिसरात गत काही दिवसांपासून चांगला पाऊस हाेत असल्याने पिके डाेलत आहेत़ ही पिके हरिण, रोही, नीलगाय फस्त करीत असल्याचे चित्र आहे़ तसेच रानडुकरांचे कळप शेतात फिरत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़ यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके व्यवस्थित उगवली नाहीत़ त्यातच वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान करणे सुरू केले आहे़ वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना जागल करावी लागत आहे़ वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ मात्र, त्यावर कुठलीही उपाययाेजना हाेत नसल्याचे चित्र आहे़
नुकसानग्रस्तांना अल्प माेबदला
वन्य प्राण्यांकडून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ मात्र, वन विभगाकडून शेतकऱ्यांना अल्प माेबदला दिला जाताे़ त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार करणे साेडून दिले आहे़ वन विभागामार्फत मागील काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेताला कुंपण करून देण्याची मागणी करण्यात आली़ मात्र, अनेक शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित असून त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही़
वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी
परिसरात वन्य प्राण्यांचा माेठ्या प्रमाणात हैदाेस वाढला आहे़ त्यामुळे या प्राण्यांचा बंदाेबस्त करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़