दुसरबीड : सततच्या पावसामुळे पिके चांगल्या स्थितीत आहेत़ मात्र, गत काही दिवसांपासून वन्य प्राणी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़
दुसरबीड परिसरात शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशी, मूग व इतर पिकांची पेरणी केली आहे़ सध्या पिके चांगल्या स्थितीत आहेत़ मात्र, गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस वाढला आहे़ वन्य प्राण्यांचे कळप शेतात शिरून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ राेही, रानडुक्कर आदी प्राण्यांचा परिसरात माेठ्या प्रमाणात वावर वाढला आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांना रात्री जागल करून पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे़ पिकांचे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकरी वनविभागाकडे तक्रार करतात़ मात्र, वनविभागाकडून ताेकडी मदत मिळते़ त्यातही पंचनामा करण्यासही बराच विलंब हाेताे. त्यामुळे मदत वाढवून देण्याची मागणी हाेत आहे़ तसेच वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे़
उभ्या पिकाचे राेही, हरिण, रानडुक्कर माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ राेहींच्या २० ते २५चा कळप शेतात शिरून नुकसान करीत आहेत़ वन्य प्राण्यांकडून हाेणाऱ्या नुकसानाचा माेबदला अल्प मिळताे़ त्यामुळे, वनविभागाने माेबदला वाढवण्याची तर वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे़
- शेख आरिफ शेख सत्तार, शेतकरी, दुसरबीड
माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही वनविभागाकडून पंचनामे करण्यास विलंब करण्यात येताे़ तसेच मिळणारी मदतही ताेकडी असते़ वन्य प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी लागते़ वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानभरपाईत वाढ करण्याची गरज आहे़ शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काँग्रेसच्या वतीने आंदाेलन करण्यात येईल़
- शेख रहमान, काँग्रेस नेते