गतवर्षी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतसुद्धा दिली. महसूलमार्फत पीक विमा आणेवारी काढण्यात आली होती. ती आणेवारीसुद्धा सिंदखेडराजा तालुक्यातील ४५ टक्के दाखविण्यात आली. शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले. शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याचा फायदा संबंधित कंपन्यांनाच झाला. याही वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कपाशी, सोयाबीन या पिकात पाणी साचलेले आहे. सोमवारी रात्री बऱ्याच भागात पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता या वर्षी पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मदत करेल का, असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पीक विम्याचा प्रश्न शासनदरबारी लावून धरल्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकते. यासंदर्भात सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा, यासाठी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे. तरी काहीच उपयोग झाला नाही. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी धनंजय देशमुख, समाधान गवई यांनी केली आहे.