लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ११९ गावातील १४ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान २०० हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे.यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांना फटका बसला आहे. बुधवारी सर्वाधिक पाऊस हा शेगाव तालुक्यात झाला असून त्याची नोंद १०८ मिमी ऐवढी आहे. तालुक्यातील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेगाव मंडळात १०५ मिमी, मनसगावमध्ये ७८, माटरगावमध्ये १०८, जलंबमध्ये ८७ आणि जवळ बुद्रूक मंडळामध्ये १६६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नदी काठची शेती काही ठिकाणी खरडून गेली होती तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने जीवनोपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाची पथके शेगाव तालुक्यातील पाचही मंडळामध्ये गेली होती. तेथे नुकसानाचा प्राथमिक अंदाज त्यांनी घेतला होता. त्यामध्ये तालुक्यात १२ हजार ४१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातही एक हजार २४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुके १५ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रभावीत झालेले आहेत. यात मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, हा प्राथमिक अंदाज असला तरी अंतिम नुकसानाचा अहवाल येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, असे सुत्रांनी सांगितले. शेगाव तालुक्यात अधिक नुकसान आहे.
२०० हेक्टरवरील जमीन खरडलीजिल्ह्यातील दोन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा अंदाज असून नेमकी कोणत्या तालुक्यातील ही शेत जमीन खरडून गेली आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही मात्र शेगाव तालुक्यात या पावसामुळे सर्वाधिक नुकसान केले आहे. त्यामुळे या तालुक्यातच हे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एकट्या शेगाव तालुक्यातील ७७ गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान जाले असून मलकापूरमध्ये १३, नांदुऱ्यात सात, जळगाव जामोदमध्ये चार, संग्रामपूर तालुक्यात पाच गावांमध्ये नुकसान झाले आहे.या तालुक्यांतही झाले नुकसानबुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकरी त्रस्त असताना घाटाखालील तालुक्यांना अतिवृष्टीचा हा फटका बसला आहे. मलकापूर तालुक्यात ३०० हेक्टर, खामगाव तालुक्यात १२४० हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३०० हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यात २७, संग्रामपूर तालुक्यात ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.