उंद्री ते किन्ही सवडत रस्त्याची दुरवस्था
अमडापूर : उंद्री ते किन्ही सवडत, पिंप्री काेरडे रस्त्यावर गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पाणी पाझरल्यामुळे पिकांचे नुकसान
सिंदखेड राजा : पावसाचे पाणी खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतात पाझरल्याने जवळपास २० एकरांमधील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी हाेत आहे.
पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी
साखरखेर्डा : परिसरात यावर्षी जाेरदार पाऊस हाेत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येत आहेत. अनेक पूल लहान असल्याने वाहतूक ठप्प हाेते. भोगावती नदीवरील पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून, काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या पूर्ववत करा !
चिखली : कोरोना महामारीच्या काळात चिखली आगारातील अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने चिखली आगार प्रमुखांकडे केली आहे.
माेताळा ते खरबडी रस्त्याची दुरवस्था
खरबडी : खरबडी ते माेताळा रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
घरकुल याेजनेची कामे संथगतीने
खरबडी : गरजू लाेकांसाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खरबडी या गावामध्ये अंदाजे ८०-८५ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, २०२२ पर्यंत घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी शासनाची अट आहे ; परंतु खरबडी या गावात याेजनेची कामे संथगतीने हाेत असल्याचे चित्र आहे.