येत्या काही दिवसात दमदार पाऊस न पडल्यास अंकुरलेले पिकांचे रोपटे सुकून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मृग नक्षत्र प्रारंभ झाल्यापासूनच शेतकऱ्यांना सोसावा लागत असून आधी पाऊस जास्त झाल्यामुळे शेती खरडून गेली. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली आहे. आता पाऊस नसल्याने पेरणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. जानेफळ महसूल मंडळात एकूण १४ गावे असून जून महिन्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाच्या ओलीवर परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी मृगाचा योग साधत खरिपाची पेरणी पूर्ण केली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे होत्याचे नव्हते केले होते. शेकडो शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले उडीद, मूग व सोयाबीन पावसात भिजून नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासल्याने अनेक शेतकऱ्यांना १०० ते ११० रुपये किलोने सोयाबीन बियाणे विकत घेणे भाग पडले आहे.
परंतु यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने पेरण्या वेळेवर झालेल्या आहेत. पिकांची उगवण सुद्धा चांगली झाली आहे. मात्र असे असतानाच मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतीत झाला आहे. परिसरात शेती करणे हाच मुख्य व्यवसाय असून वर्षभर शेतीचे कामे करून ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. सध्या महागाईच्या काळात शेती करणे परवडत नाही, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. मात्र तरी सुद्धा काही शेतकरी आपली शेती ठोका व बटईने देतात तर अनेक शेतकरी स्वतःच मेहनत घेत शेतीचे कामे करीत असतात.
पेरणीचा खर्च वाढला
यावर्षी पेरणीचा वाढलेला खर्च तसेच बी-बियाणे व रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलेले आहे. असे असताना सुद्धा शेतकरी बांधवांनी मोठ्या हिमतीने पेरणी केलेली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाऊस गायब झाल्याने पाण्याअभावी पिके सुकण्याची वेळ आली आहे.