---
बुलडाणा : विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी सामान्य नागरिकांची बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. प्रत्येक नागरिकाला पैसे मिळावे, यासाठी बँकांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिक समजून घेत नसल्याने बँकांसमोरील गर्दी वाढतच आहे.
-
शेकडो हेक्टरवरील गहू काढणीला
चिखली : रब्बी हंगामात उशिरा पेरणी करण्यात आलेला गहू सध्या काढणीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उशिरा गव्हाची पेरणी केली. पहिल्या टप्प्यात पेरणी करण्यात आलेल्या गव्हाची काढणी संपली असून शेवटच्या टप्प्यात पेरणी झालेल्या शेतांमधील गहू सध्या काढणीला आला आहे. तर शेतकऱ्यांची खरिपाची तयारी सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतीकडून खबरदारी उपाययोजना
बुलडाणा : तालुक्यातील बिरसिंगपूर ग्रामपंचायतीकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रविवारी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील विविध वस्तींमध्ये निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली.
---
नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई
बुलडाणा : कोरोना या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिकेच्या दक्षता पथकाकडूनसुद्धा नागरिकांना आवाहन केले जात आहे.
गुरांचा बाजार बंद असल्याने शेतकरी त्रस्त
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे गत दीड महिन्यापासून खामगाव येथील गुरांचा बाजार बंद आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना आपली जनावरे आणि बकऱ्या विकता येत नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी आपली जनावरे विकतात.
भाजीपाला दुकानांवर नागरिकांची गर्दी
बुलडाणा : मलकापूर रोड परिसरातील भाजीपाला दुकानांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगकरिता चुन्याने रकाने आखून देण्यात आल्यानंतरही या रकान्यांचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. भाजीपाला विक्रेत्यांकडून ग्राहकांना याबाबत कोणत्याही सूचना दिल्या जात नाहीत.
सततच्या भारनियमनामुळे नागरिक हैराण
मोताळा : शहर आणि परिसरात सातत्याने विजेचे भारनियमन सुरू आहे. ऐन संचारबंदीत भारनियमन सुरू असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संचारबंदी काळातील भारनियमनात कपात करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मोताळ्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
मोताळा : शहरातील विविध रस्त्यावर असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्या जात आहे. दुकानांवर चुन्याने रकाने आखून देण्यात आल्यानंतरही कोणत्याही प्रकारची दक्षता या दुकानांवर बाळगल्या जात नाही.
---
विहिरींनी गाठला तळ
धामणगाव धाड : तालुक्यातील अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावांमध्ये नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येत्या काळात पाणीटंचाई आणखी तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.