१५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतीमध्ये ४,७५१ जागांसाठी मतदान होत असून १० लाख ३४ हजार ३३ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहे. यामध्ये ४ लाख ९० हजार ५२२ महिला तर पाच लाख ४३ हजार ५११ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. मात्र मधात तीन दिवस सुटी आल्याने अनेकांनी अर्ज दाखल केले नव्हते. त्यातच ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येत होते. त्याचीही अनेक ठिकाणी अडचण आली होती. परिणामी अखेर निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास मुभा दिल्याने ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मोठी गर्दी केली होती. शेवटचा दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत स्वीकारण्यात आलेल्या अर्जाची निवडणूक विभागाकडून तपासणी सुरू होती. जिल्ह्यातील सर्व तहसीलवर हे चित्र होते.
दुसरीकडे एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी साधारणतः ५० हजार रुपये खर्च येत असून ५२७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ कोटी ६३ लाख ५० हजार रुपयांचा प्रशासकीय खर्च येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मात्र गेल्या निवडणुकीचाच सुमारे ९० लाख रुपयांचा खर्चाची रक्कम अद्याप जिल्ह्यास मिळालेली नाही.
सोमवारी लढतीचे चित्र होईल स्पष्ट
आता ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या दिवशी किती उमेदवार माघार घेतात हे स्पष्ट होईल. त्यानंतर जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतीमधील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान येत्या चार दिवसात ग्रामपंचायत अविरोध करण्यासोबतच अर्ज मागे घेण्यासाठी अनेकांची मनधरणी ग्रामीण भागातील अनेक जण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
१५ जानेवारी रोजी फैसला
जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी जाहीर होणार आहे. मात्र यास अद्याप अवकाश आहे. उमेदवारांना २५ हजार ते ५० हजार रुपयापर्यंत निवडणूक खर्च करण्याची मर्यादा आयोगाने घालून दिली आहे. सोबतच एक दिवस आड उमेदवारांना त्यांचा खर्च सादर करावा लागणार आहे. सहकारी बँकांमध्येही उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी खाते उघडण्यास मुभा देण्यात आली आहे.