बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जवळपास एक हजार नागरिकांनी लसीसाठी गर्दी केली होती. मात्र उपलब्धता मात्र अवघी १८० डोसची होती. त्यामुळे येथे गोंधळ उडाला आणि नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. अशीच काहीशी स्थिती मेहकर येथेही बघण्यास मिळाली होती. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या तीन टप्प्यातील लसीकरण मोहिमेत आजपर्यंत दिलेल्या एकूण उद्दिष्टाच्या २४ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील नागरिक असे मिळून ९ लाख २६ हजार ९२७ जणांचे लसीकरण जिल्ह्यात करावयाचे होते. त्यापैकी प्रत्यक्षात २ लाख २३ हजार ५४४ जणांचे ३० एप्रिलपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी २ लाख ६२ हजार ६७३ डोसचा वापर करण्यात आला आहे. यातील १२ हजार ३२० डोस अद्यापही शिल्लक आहेत.
--आतापर्यंत झालेले लसीकरण--
आरोग्य कर्मचारी- ८९ टक्के (१५०५३)
फ्रंटलाईन वर्कर्स- १०४ टक्के (२१,७३२)
४५ वर्षांवरील नागरिक:- २१ टक्के (१,८६,७५९)
एकूण :- २४ टक्के (२,२३,५४४)
--चौथ्या टप्प्यात २१ लाख नागरिकांना डोस--
लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यातील २१ लाख नागरिकांना अर्थात जिल्ह्यातील ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. याची व्याप्ती मोठी असल्यामुळे सध्या प्रशासकीय पातळीवर नियोजनालाच प्राधान्य देण्यात येत आहे. नाही म्हणायला प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ३६८ व्यक्तींना ही लस दिल्या गेली आहे. ७,५०० डोस यासाठी उपलब्ध झालेले आहेत.
--पोलिसांना करावे लागले पाचारण--
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर लसीकरण केंद्र आहे. महाराष्ट्रदिनी या केंद्रावर वृद्धांसह अन्य नागरिकांनी मोठी गर्दी करीत लसीची मागणी केली होती. त्यामुळे येथे मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले होते. त्यानंतर येथील गर्दी नियंत्रणात आली.
--सेशनची नसते माहिती--
लसीकरण केंद्रावर पहिल्या डोसचे की दुसऱ्या डोसचे सेशन आहे, याची माहितीच उपलब्ध होत नाही. अगदी शेवटच्या क्षणी ही माहिती उपलब्ध होत असल्याने, लसीकरण केंद्रावरील आरोग्य विभागाचे कर्मचारी व डॉक्टरांनही त्रास होत असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टराने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.