मे महिन्याच्या मध्यावर वर्तमान स्थितीत तरी जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब समोर येत असून मार्च महिन्याच्या तुलनेत बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांनी वाढले असून ते आता ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. अद्यापही डिसेंबर २०२० च्या ९६ टक्क्यांच्या आसपास हा आकडा पोहोचला नसला तरी एकंदरीत स्थिती पाहता त्यादिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहे. अर्थात कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मार्च महिन्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ११.११ टक्के होता तर १३ मे रोजी तो १५.२१ टक्के आहे. वरकरणी तो वाढलेला दिसत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. गेल्या १२ दिवसात ११ हजार ८२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
--दररोज ९८६ जणांची कोरोनावर मात--
मे महिन्याच्या पहिल्या १२ दिवसाचा विचार करता सरासरी ९८६ जण दररोज कोरोनावर मात करत आहे तर ८३२ जण कोरोनाबाधित होत आहे. त्यामुळे बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या १२ दिवसात जिल्ह्यात ९ हजार ९८९ जण कोरोना बाधित झाले तर तब्बल ११ हजार ८२७ जणांनी कोरोनावर मात केली. ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
----
टक्केवारी १ मार्च १ एप्रिल १ मे १३ मे
पॉझिटिव्हिटी रेट ११.११ टक्के १४.१६ टक्के १४.८० टक्के १५.२१ टक्के
मृत्यूदर १.०३ टक्के ०.६९ टक्के ०.६३ टक्के ०.६५ टक्के
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.५१ टक्के ८४.५१ टक्के ८८.४७ टक्के ९२.५३ टक्के