- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : पाण्याची कमतरता, त्यात जमीनीचा पोत खराब, अशा परिस्थितीत सातत्याने नुकसान सोसावे लागत असल्याने पारंपारीक पिकाला फाटा देत कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळाची लागवड करून राजेंद्र वाघमारे यांनी तोट्यात जाणाऱ्या शेतीचे फायद्यात रूपांतर केले. त्यांच्या शेतातील उच्च दर्जाचे सीताफळ थेट जयपूर आणि इंदुरच्या बाजारात विकले जात आहेत. लाखो रूपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.तालुक्यातील सोमठाणा येथील राजेंद्र श्रीराम वाघमारे हे उच्चशिक्षित, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिखली येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शेतीशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. त्यांच्याकडे साडेसात एकर जमीन आहे. डोलखेडा येथील दत्तात्रय राऊत यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांनी ३ एकरावर काटक अशा सीताफळाची २०१५ मध्ये लागवड केली. लागवडी पश्चात तीन वर्षांनंतर त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. तीन एकर शेतात १० बाय १० या अंतरावर ८०० सीताफळांच्या झाडांची लागवड केली. झाडांना ठिबकव्दारे पाणी देऊन जगविण्याचे काम केले. राज्यातील विविध भागातील शेतकरी त्यांची शेती पहायला येतात. पहिल्या वर्षी साडेतीन लाख, दुसऱ्या वर्षी चार लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. यंदा मध्यप्रदेशातील इंदुर येथून मागणी आली असून ८० ते १३० रूपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळत आहे.
सीताफळ हे कमी पाण्यात येणारे फळपीक असल्याने याकडे आता अनेक शेतकरी वळले आहे. लागवड जास्त होत असल्याने भाव कमी होत आहेत. आपल्या भागात सीताफळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी होणे गरजेचे आहे. -राजेंद्र वाघमारे, सोमठाणा.