नीलेश शहाकार / बुलडाणा दैनंदिन जीवनात वस्तू वा सेवा खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, ग्राहक मंचाकडे न्याय मागणार्यांची संख्या मात्र वाढू शकली नाही. गेल्या २४ वर्षांंत बुलडाणा जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे केवळ ६ हजार ६८६ तक्रारी दाखल झाल्या. बाजारातून वस्तू किंवा सेवा घेताना बर्याच वेळा ग्राहकांना फसव्या जाहिराती, जास्त किमती, निकृष्ट दर्जा तसेच असमाधानकारक, अकार्यक्षम सेवा यामुळे आर्थिक नुकसान व मनस्ताप सोसावा लागतो. ही पिळवणूक टाळण्यासाठी तक्रारी, अडी-अडचणी योग्य त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. वैयक्तिक पातळीवर न्याय मिळवा या उद्देशातून बुलडाणा जिल्ह्यात १९९0 ला जिल्हा ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली.गेल्या २४ वर्षांत बुलडाणा जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे ६ हजार ६८६ ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी ६ हजार ३२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर सध्या ३५७ प्रकरणांचा निपटारा करणे बाकी आहे. शिवाय ग्राहक मंचाने दिलेल्या निकालावर ३२१ अवमान याचिका दाखल करण्यात आल्या. यात २0४ प्रकरणे निकाली काढण्यात काढण्यात आले. तर ११७ प्रकरणे प्रलंबित आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १0 लाखांच्या वर आहे; मात्र तरीही जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कासाठी तक्रार करण्यास लोक पुढे येत नाहीत, हे स्पष्ट होत आहे. पैसे घेऊन जो आपल्या सेवा देतो अथवा वस्तू देतो त्या प्रत्येक व्यक्ती अथवा संस्थेच्या विरुद्ध फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार करू शकतो. यासाठी आपल्या हक्काबाबत ग्राहकांमध्ये जागृती असणे आवश्यक असल्याचे जिल्हा ग्राहक मंचाचे माहिती अधिकारी टी.एम. नाईक यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
ग्राहक कायद्याविषयी ग्राहक अनभिज्ञ
By admin | Published: December 24, 2014 12:12 AM