बुलडाणा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या सायकल रॅलीत नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते सायकल रॅलीचा प्रारंभ करण्यात येतो. यंदा हा मान श्रुती मालू या विद्यार्थिनीस मिळाला आहे. गांधीभवन येथे तिच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात होणार आहे. तर एस.टी. बसस्थानक येथे मान्यवरांच्या हस्ते २० झाडे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी षण्मुखराजन, उपवनसंरक्षक बी. टी. भगत, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकूमार वºहाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र लोखंडे, तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश वाघमोडे, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, ठाणेदार यु.के.जाधव, तहसीलदार सुनील शेळके, दिनेश गीते, खंदारे, काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत
सात हजार झाडे लावली
पर्यावरण मित्र मंडळाने जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी ही संकल्पना बुलडाणा येथे सुरू केली आहे. बुलडाणा शहरातील ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल त्यांच्या घरी जायचे. खड्डा खोदून झाडे लावायचे. आतापर्यंत या माध्यमातून पर्यावरण मित्रांनी सात हजार झाडे लावली आहेत. पर्यावरण मित्रांनी लावलेल्या झाडांपैकी ९५ टक्के झाडे जगली आहेत. तसेच वृक्ष वेदना मुक्ती अभियान राबवून झाडांमध्ये जाहिरात करण्यासाठी लावलेली हजारो खिळे काढली. याद्वारे झाडांना वेदनामुक्त केले आहे. या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी २५० ठिकाणी दानापाणी पात्र लावून पक्ष्यांची तहान भागवण्याची व्यवस्था केली.
असा असेल रॅलीचा मार्ग
पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी बुलडाणा शहरातून पर्यावरण जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या सायकल रॅलीचा प्रारंभ जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून होईल. तर बाजार लाईन, भगवान महावीर चौक, कारंजा चौक, स्व.भोंडे सरकार चौक, एडेड चौक, मोठी देवी, त्रिशरण चौक, सोसायटी पेट्रोल पंप, चिंचोले चौक, शिवनेरी चौक, संगम चौक मार्गे बसस्थानकाच्या आवारात वृक्षारोपण करून रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.