सिंदखेडराजा: सिलींडरच्या स्फोटात घर जळून खाक झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली. सुदैवाने या आगीत कुठलीच जीवीतहानी झाली नाही. मात्र घर मालकाचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तांदूळवाडी येथे श्रीकृष्ण हरिभाऊ मारके यांचे घर आहे. बुधवारी सकाळी ते चहा घेऊन शेतात निघून गेले. त्यांची पत्नी स्वयंपाक करीत होती. त्यावेळी अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला. गॅसच्या नळीची आग विझवित नाही तोच टीव्हीचा स्फोट झाला. थोड्याच वेळात अचानक संपूर्ण घर पेटले. त्यामुळे घरातील सिलींडर काढणे सुध्दा अशक्य झाले होते. संपूर्ण घर आगीच्या कचाट्यात सापडले. सिलींडरच्या स्फोटाच्या भितीने लोक दूर अंतरावर उभे राहून पाहत होते. काही मिनिटातच सिलींडरचा जोरात स्फोट झाला. क्षणार्धात स्लॅबसह घर खाली कोसळले. या आगीत श्रीकृष्ण मारके यांचे फर्निचर, टिव्ही, नगदी २५ हजार रुपये, कपडे, धान्य यासह संपुर्ण संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. तर त्यांच्या मुलाच्या हाताला भाजल्याने तो जखमी झाला. आगीत संपूर्ण घर खाक झाल्याने हरीभाऊ मारके यांचे कुटूंब उघड्यावर आले. त्यामुळे गजानन शेळके, शिवसेना विभाग प्रमूख अनंता शेळके यांनी त्यांची तात्पूरती राहण्याची व्यवस्था केली. यामाध्यमातून माणूसकीचा प्रत्यय पाहावयास मिळाला. (तालुका प्रतिनिधी)
सिलींडरच्या स्फोटात घर जळून खाक; जीवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:48 PM