बुलडाणा : जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई उपशहरात प्रशासकीय बदली करण्यात आली असून जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून गोंदीयाचे पोलिस अधीक्षक डि.के.पाटील-भुजबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती राज्याच्या गृहविभागाच्यावतीने एका आदेशान्वये शुक्रवारी संध्याकाळी उशिरा केली. पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी २८ एप्रिल २०१७ रोजी बुलडाणा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतला होता. जवळपास १५ महिन्याच्या कारकिर्दीत पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी प्रशासकीय कामकाजावर पकड घेवून जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पुढाकार घेतला होता. याशिवाय ग्रामीण भागातील अवैध दारू व्यवसाय बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेवून ग्रामपंचायती व गावातील महिलांच्या मागणीनुसार कारवाई करून अनेक गावात दारूबंदी केली होती. मात्र अवैध व्यवसाय व अवैध दारूबंदी करण्यासाठी त्यांना काही प्रमाणात यश आले. मिना यांनी पोलिसांची समाजातील प्रतिमा उंचावण्यासाठी भर दिला होता. त्यांनी पोलिस कल्याण शाखा मजबूत करून पोलिसांच्या कुटुंबियांसाठी निधी जमा केला. पोलिस कर्मचाºयांना त्यांनी इच्छूक ठिकाणी बदली देवून त्यांचे आरोग्य जोपासण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी पोलिस कर्मचारी आनंदी होते. त्यांनी पोलिस कर्मचाºयांसाठी नवीन वसाहतीच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. याशिवाय आपल्या काळात स्थानिक गुन्हे शाखा, विशेष गुन्हे शाखा मजबूत करण्याचा प्रयत्न करून जुने गुन्हे उघडकीस आणले. यांची बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षकपदाची १५ महिन्याची कारकिर्द भ्रष्टाचार मुक्त राहिली असली तरी इतर अधिकारी, पोलिस यंत्रणा भ्रष्टाचार मुक्त ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न कमी पडल्याचे दिसून येते. त्यामुळे बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेणारे नवीन पोलिस अधीक्षक डि.के.पाटील-भुजबळ यांच्याकडून जिल्हावासीयांत्तच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
डी. के. पाटील-भुजबळ बुलडाणा जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 3:16 PM
बुलडाणा : जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई उपशहरात प्रशासकीय बदली करण्यात आली असून जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून गोंदीयाचे पोलिस अधीक्षक डि.के.पाटील-भुजबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई उपशहरात प्रशासकीय बदली करण्यात आली. मिना यांनी पोलिसांची समाजातील प्रतिमा उंचावण्यासाठी भर दिला होता.