सिंदखेड राजा तालुक्यातील रुम्हणा येथील रंगनाथ खेडकर हे ३१ मे रोजी पांगरी उगले फाट्यानजीक गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे गबाजी खेडकर, रा. रुम्हणा यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये रंगनाथ खेडकर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यांची नंतर दुचाकी पांगरी उगले फाट्यापासून १ किलोमीटर अंतरावर मिळाली होती. ३ जून रोजी पेनटाकळी धरणात रंगनाथ खेडकर यांचा मृतदेह हात पाय बांधून, पोटाला दगड बांधून टाकण्यात आल्याचे उघडकीस आले हाेते. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हाेता. पोलीस अधीक्षक चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकरते यांनी आरोपींचा शोध लावत भरत प्रल्हाद जायभाये, अंकुश शिवाजी डोईफोडे, दोघे रा. जागदरी, ता. सिंदखेड राजा या दोघांना ६ जून राेजी अटक केली. त्यांना अमडापूर पोलिसांनी ७ जून रोजी चिखली न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यातील एक आरोपी फरार झाल्याचे अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमित वानखेडे यांनी सांगितले आहे. अमडापूर, साखरखेर्डा, किनगाव राजा पोलीस स्टेशन व बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करीत या खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. खुनाचे कारण आराेपींच्या पाेलीस काेठडीत समाेर येणार आहे.
शेतकऱ्याच्या हत्येप्रकरणी दाेघांना अटक, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:42 AM