सर्वेक्षण प्रगतीपथावर
आकडा वाढणार
मुसळधार पावसाने नदी, नाल्यांना पूर : पिके गेली वाहून
नवीन मोदे
धामणगाव बढे : मोताळा तालुक्यात ६ आणि ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार मोताळा तालुक्यातील ८३ गावातील ५ हजार ८०८ शेतकऱ्यांच्या शेतातील ४ हजार ७८० हेक्टरवरील कापूस, मका, सोयाबीन या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सतत पाऊस सुरू असल्यामुळे पंचनामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले आहेत. नदी आणि नाल्यांच्या काठावर असलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
कृषी विभागाने ८ सप्टेंबर रोजी वरिष्ठांना पाठवलेल्या अहवालामध्ये नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोताळा तालुक्यातील नुकसानीचा हा प्राथमिक अहवाल असून, यात वाढ होईल, असे तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले. मोताळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेली घरांची पडझड तथा विहिरींचे नुकसान याचे सर्वेक्षण महसूल विभागातर्फे करण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते सर्वेक्षणात व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन घेतला नाही.
बांध फुटल्याने पिके गेली वाहून
धामणगाव बढे येथील पांगरखेड शिवारातील बांध फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक वाहून गेले आहे. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने उत्पादनात माेठी घट येणार आहे. बांध फुटल्यामुळे दिनकर बढे, हसन भिल, शेख अमीन शेख हुसेन यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.