लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसत असून या कालावधीत जिल्ह्यात या पावसामुळे महावितरणसह सर्वसामान्य नागरिकांचे ८ तालुक्यात नुकसान केले आहे. २९ मे रोजी चिखली तालुक्यातील दोन गावांत वीज पडून दोन गुरांचा मृत्यू झाला आहे. मान्सूनपूर्व हा पाऊस कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांत बरसला असून खामगाव तालुक्यातील सुटाबा बुद्रूक येथील वर्षा भोपळे यांच्या स्वस्त धान्य दुकानावरील टीनपत्रे उडून गेल्यामुळे दुकानातील दोन ते तीन क्विंटल गहू व तांदूळ भिजल्याने नुकसान झाले आहे. खामगाव तहसीलदारांनी त्याचा अहवाल सादर गेला आहे. यासोबतच २८ मे रोजी शेगाव तालुक्यातील पहुरजिरा या गावात वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसामुळे गाव परिसरातील १० ते १५ घरांवरील टिनपत्रे उडून गेली आहे. तसेच वाऱ्यामुळे उडालेले टीन लागून एका बैलाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याव्यतिरिक्त मलकापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथेही २९ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे गावातील काही घरांवरील तथा गोठ्यांवरील टिनपत्रे उडून गेली आहेत. सुदैवाने आतापर्यंत जिल्ह्यात या पावसामुळे कोठेही जीवित हानी झाल्याची माहिती नाही.
बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान; सर्वेक्षणास झाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:53 AM