तालुक्यातील जानेफळ मंडळातील उटी शिवारात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी फळबागेतून लाखो रुपये कमवत आहेत. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने उटी येथील शेतकरी मोतीराम हरमकर, संजय सुळकर, चंद्रपाल धोटे, अमोल धोटे, धनंजय धोटे, सुरेश काठोळे, मनिष आंधळे, विष्णू आंधळे, सोनाजी आमले, प्रकाश लाड, कासम भाई व अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे केळी व संत्रा पिकांच्या बागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे संत्रा झाडे उन्मळून पडली तर केळीची झाडे जमिनीवर झोपली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमाेर संकट उभे राहिले आहे. अगोदरच कोरोनामुळे शेती व शेतमालाचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. अशा परिस्थितीत या नैसर्गिक संकटाने शेतकरी खचून गेले आहेत. या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
काेट
कृषी अधिकारी व ग्रामसेवक यांना तत्काळ नुकसानीची माहिती देण्यात आली असून, तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.
- वर्षा संजय सुळकर, सरपंच, उटी