एसटीच्या उत्पन्नाला ब्रेक
मेहकर: कोरोनामुळे एसटीचीही चाकेही आता थांबली आहेत. कडक निर्बंधामुळे प्रवासी नसल्याने येथील आगारातून सध्या एकही बस जात नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नालाच ब्रेक लागला आहे.
राहेरी पुलाचे झाले, इतर पुलांचे काय?
बुलडाणा : जिल्ह्यातील ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या राहेरी पुलासाठी ९ कोटी ८५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. अनेक दिवसांपासून राहेरी पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. या पुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे, परंतु इतर पुलांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नियमांमुळे रोखता येईल तिसरी लाट
बुलडाणा : वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आता तिसरी लाट येणार असल्याने अनेकांनी धास्ती धरली आहे. परंतु प्रत्येकाने नियमांचे पालन केले, कोरोनाची त्रिसूत्री पाळली, तर ही तिसरी लाट रोखता येऊ शकते, असे आरोग्य विभागाचे मत आहे.
पिंपळगाव काळे रस्त्याची होणार सुधारणा
बुलडाणा: जिल्ह्यातील काही प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये पिंपळगाव काळे, जिगाव, चांदुरबिस्वा, वडनेर, जवळा बाजार, कोथळी, तराडा, वरवंड या रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे.
१० टक्के रेमडेसिविर आरक्षित
बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे फ्रंटलाईन वर्करसाठी १० टक्के रेमडेसिविर इंजेक्शन आरक्षित ठेवण्यात येत आहेत. परंतु दररोज येणाऱ्या इंजेक्शनमधून हा कोटा किती दिवस ठेवावा, याबाबत योग्य ते धोरण ठरविण्याची गरज आहे.
लोणार तालुक्यात ९१ पॉझिटिव्ह
लोणार : शहर व तालुक्यात १४ मे रोजी एकूण ९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येथील कोविड सेंटरमध्ये खाटा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेलसूर येथे १३२ जणांचे लसीकरण
शेलसूर : प्राथमिक आरोग्य केंद्र एकलाराअंतर्गत शेलसूर येथे १३ मे रोजी कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी धोत्रा भणगोजी, शेलोडी, आंधईसह शेलसूर येथील १३२ जणांना लस देण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. योगेश बाहेकर यांच्या मार्गदर्शनात ही शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी आरोग्य सेवक सुरेश मुरकुटे, आरोग्य सेविका गवई यांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच विजय धंदर, उपसरपंच सुनील धुंदळे, राजेंद्र गायकवाड, अजिंक्य रिंढे, सुभान खंडागळे, सावळे, आशा खरात, रुख्मिना कापसे, संगीता वानखडे, गणेश कापसे, विश्वास गंडे यांनी सहकार्य केले.
बाजार समित्यांच्या कोविड सेंटरची प्रतीक्षा
बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बाजार समित्यांनी आपापल्या आवारात कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे परिपत्रक पणन संचालनालयाने काढले आहे. परंतु, अद्यापही बाजार समित्यांच्या कोविड केअर सेंटरची प्रतीक्षा आहे.
थंड पाण्याच्या दुकानाला पाच हजारांचा दंड
मेहकर : लाॅकडाऊनच्या काळात थंड पाण्याची विक्री करताना गर्दी केल्याप्रकरणी मेहकर येथील विदर्भ ॲक्वाला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तहसीलदार डॉ. संजय गरकळ व मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
“एक जिल्हा एक उत्पादन”
बुलडाणा : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री योजना असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयान योजना पाच वर्षाच्या कालावधीसाठी आहे. ही योजना “एक जिल्हा एक उत्पादन” या धर्तीवर राबविली जाणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतमालाच्या दराबाबत चर्चा
बुलडाणा : तालुक्यातील ग्रामपंचायतीत ई-ग्रामसभा घेऊन गावात असलेले शेतकरी गट, परिसरात असलेले शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सहकार्य घेऊन शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भावापेक्षा जास्त दर कसा मिळेल या सदंर्भात चर्चा करण्यात आली. तसेच गावाची पाण्याची गरज, उपलब्ध होणारे पाणी व त्याची संरक्षित सिंचनाची व्यवस्था करणे या सर्व गोष्टींची चर्चा ग्रामसभेत करण्यात आली.