सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह इतरही पिकांना कोंब फुटून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केले होते. त्यामधून लोणार तालुका वगळण्यात आला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. चुकीचे सर्वेक्षण केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले. लोणार तालुक्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होता. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे लोणार तालुक्यातील मूग, उडीद ही पिके हातची गेली. तर सोयाबीनच्या उभ्या पिकांमधील शेंगांना कोंब फुटले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व मंडळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोणार तालुक्यातील मंडळात अतिवृष्टी होऊनही शासनदरबारी योग्य ते पंचनामे सादर केले नाहीत. लोणार तालुक्यात अतिवृष्टी झाली नसल्याची चुकीची नोंद महसूल दफ्तरी झाल्यामुळे लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा निवेदनाद्वारे भुमराळा येथील शेतकरी देवानंद सानप यांच्यासह शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्या मेलवर केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:04 AM