खामगाव: शहरात डेंग्यू आजाराने चांगलेच डोके वर काढल्याचे दिसून येते. एकाच आठवड्यात तब्बल चार रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य प्रशासनासोबतच पालिका प्रशासनही कामाला लागले आहे.
खामगाव शहरातील समता कॉलनी भागातील दोन मुलींना डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे उघडकीस येत नाही तोच, याच भागातील एक युवकही डेंग्यू पॉझीटिव्ह असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे समता कॉलनी नजिक असलेल्या वामन नगर भागातही आणखी एका १३ वर्षांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली असतानाच, पालिका प्रशासनही खळबळून जागे झाले. दरम्यान, प्रथम लागण झालेल्या दोन मुलींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजते. त्यांच्यावर अकोला येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर युवक आणि १३ वर्षीय मुलगा देखील अकोला येथेच उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
खामगावातील २०९ घरांचे सर्वेक्षण!
डेंग्यू आजाराच्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने समता, वामन नगरातील २०९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. एमपीडब्ल्यू आणि एएनएमच्या सदस्यीय पथकासोबतच अर्बन हेल्थच्या ९ सदस्यीय पथकाचा यामध्ये समावेश होता.
रक्त नमुनेही केले संकलित!आरोग्य विभागाकडून वामन नगर, समता कॉलनी भागातील १०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारपर्यंत १०९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. कंटेनर तपासणीसह जलतापाचेही सर्वेक्षण करण्यात आले. तसेच डेंग्यूची लागण झालेल्या युवकाच्या कुटुंबातील ५ जणांचे रक्त नमुनेही गोळा करण्यात आले.
धुरळणीसाठी पालिकेस पत्र!शहरातील डेंग्यू आजाराचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून पालिका प्रशासनाला धूर फवारणी करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. प्रकोपग्रस्त भागातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याचेही या पत्रात सूचित केले आहे.
पालिकेसही आली जाग!
डेंग्यू आजाराचे ३ रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडूनही स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली जात आहे. शुक्रवारी सकाळीच पालिकेचेही आरोग्य पथक समता कॉलनीसह शहराच्या इतर भागात धडकले होते.
खामगावातील चौघांना डेंग्यूची लागण झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रकोपग्रस्त भागात सर्वेक्षण करून रक्त नमुणे गोळा करण्यात आले आहे.
- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रूग्णालय, खामगाव.