साखरखेर्डा :
वीरशैव सांप्रदायात गुरूला खूप मोठं महत्त्व आहे़ आपले जीवन घडविण्यासाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभते. सिद्धतत्त्वाचे ज्ञान सद्गुरु करून देत असल्याने मानवी जीवनातील अंधार वाटा उजळून जातात, असे मत १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी पीठात आयोजित कार्यक्रमात ते ऑनलाईन आशीर्वचनातून प्रबोधन करीत होते.
प्रारंभी वेदमूर्ती हितेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले़ वेदमूर्ती विश्वनाथ स्वामी यांनी पंधरा मिनिटे शंखनाद केला़ डॉ़ शंकर स्वामी नांदेड, डॉ़ महाजन औरंगाबाद, डॉ़ प्रकाश स्वामी, सतिषआप्पा तवले जालना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आशीर्वचनात सिद्धलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, माणूस अंधारात भटकत असताना त्याला मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात़ यावेळी ओमप्रकाश स्वामी (रा. लिंबा, जि. परभणी) यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिली, तसेच नालवाडा येथील बोडखे दाम्पत्याने सव्वा लाख रुपये देणगी अर्पण केली. यावेळी वीरशैव महिला मंडळ रिसोड यांनी चांदीच्या पादुका अर्पण केल्या. महाप्रसादाने कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन शिवानंदन वाकदकर यांनी केले़