बुलडाणा : सध्या प्रत्येक वस्तूचे दर वाढल्याने महागाई डोके वर काढू देत नाही. त्यातच चैनीच्या वस्तूंचे दरही नकळत सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करीत आहेत. विशेष म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबाला महिन्याला अडीच हजाराचा निव्वळ डेटा प्लॅन लागत असून, यामुळे त्या कुटुंबाचा बँक बॅलन्स कधी रीता होतो याचा थांगपत्ताही लागत नाही.
आधुनिक जगासोबत वाटचाल करण्यासाठी आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये विविध ॲप्स हाताळणीसाठी आणि क्षणाक्षणाला अपडेट राहण्यासाठी इंटरनेट आवश्यकच झाले आहे. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेता विविध सीमकार्ड कंपन्यांनी आकर्षक आणि मनाला भावतील अशा ऑफर्स देऊन ग्राहक जोडले आहेत. या ग्राहकांना महिन्याचा इंटरनेट डेटा आणि सोबतच इनकमिंग-आऊटगोईंग कॉलिंगसाठी विशिष्ट प्लॅन तयार केले आहेत. त्या प्लॅनशिवाय पर्यायच शिल्लक राहत नसल्याने प्रत्येकजण या प्लॅनचा वापर करतात. तेव्हा चार सदस्य असलेल्या कुटुंबात चारही व्यक्तींना डेटा प्लॅन घ्यायचा असल्यास तब्बल २४०० रुपये मोजावे लागत आहेत. हा खर्च योग्य जरी वाटत असला तरी तुमचा बँक बॅलन्स रीता करणारा नक्कीच आहे.
असे बिघडते आर्थिक गणित
चार सदस्य असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील चारही सदस्यांकडे स्मार्टफोन आहे. त्यातील एक सदस्य ८४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन निवडतो. त्यासाठी त्याला ५९९ रुपये माेजावे लागतात. आता त्याच कुटुंबातील गृहिणीही तोच प्लॅन निवडत असेल तर पती-पत्नीचे एकूण १२०० रुपये निव्वळ डेटा प्लॅनमध्ये खर्च झालेले असतात. एकूण वाढत्या महागाईच्या काळात हा खर्च अनेकांचा बँक बॅलन्स कमी करणारा आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळेही खर्च वाढला
कोरोनामुळे शाळा, क्लासेस सद्यस्थितीत बंद आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीनेच घेतले जात आहेत. त्यासाठी त्या मुलाकडे स्मार्टफोन असणे गरजेचे असून, त्यामध्येही इंटरनेटचे रिचार्ज करावेच लागते. तेव्हा कारण नसताना सर्वसामान्य कुटुंबात निव्वळ मोबाइलची संख्या वाढत असून, त्यामध्ये इंटरनेट डेटा प्लॅन टाकून आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.