लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : वाढत्या गावरान दारु विक्रीमुळे गावातील पुरुष व मुले व्यसनाधीन होऊन भांडण व तंटे वाढण्यासोबतच सुखी संसाराची राखरांगोळी होत असल्याने, महिलांनी संघटित होऊन १४ जुलै रोजी वडाळी गाव परिसरतील दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यावेळी जप्त केलेले दारू तयार करण्याचे साहित्य वाहनाद्वारे थेट जानेफळ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर देशी दारु विक्रीची दुकाने गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या लोकांचा मोर्चा सध्या गावरान दारूकडे वळलेला आहे. याला पायबंद घालण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन तथा उत्पादन शुल्क विभाग कुठलेच पाऊल उचलत नसल्याने तथा अनेकवेळा या गावरान दारु विक्रेत्यांच्या नावानिशी तक्रारी देऊनसुद्धा कारवाईऐवजी छुपे सहकार्य या विक्रेत्यांना केले जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आदिवासीबहुल वस्ती असलेल्या वडाळी या गावातील महिलांनी संघटित होऊन गावठी दारू हातभट्ट्यांवर एल्गार मोर्चा नेला. यामध्ये निर्मलाबाई पारस्कर, वनमालाबाई देवराव शिंदे, पुंजाबाई सुरेश घुगरे, चंद्रभागाबाई लक्ष्मण डाखोरे, राईबाई सुभाष शिंदे, वनमालाबाई रमेश धोत्रे, वनिता सुखदेव गायकवाड, शोभा देवीदास गायकवाड, ज्योती दुर्योधन शिरसाठ, द्वारकाबाई वसंता झाटे, सुमनबाई अर्जुन सुरडकर यांच्या नेतृत्वात गावाशेजारील मन नदीच्या पात्रात पोहचून तेथे सुरू असणाऱ्या गावरान दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच टपरी डबे ३५ नग आॅटोद्वारे जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये आणत ठाणेदार राहुल मोरे यांच्या ताब्यात दिले आहे.
महिलांनी केल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Published: July 15, 2017 12:32 AM