खामगाव: दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू डॉ. सैय्यद मोहंमद बुरहानुद्दिन यांचे पुत्र डॉ. सैयदना आलीकदर मुफद्दल सैफुद्दिन हे बुधवार १0 फेब्रुवारी रोजी खामगाव येथे येत आहेत. धर्मगुरू प्रथमच खामगावात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शहरात बोहरा समाजबांधवांच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरातील जगदंबा चौकात असलेल्या बोहरा समाजाच्या मशिदीची साफसफाई करून रंगरंगोटी करण्यात आली, तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या दौर्यादरम्यान धर्मगुरू डॉ. सैयदना आलीकदर मुफद्दल सैफुद्दिन हे शहरातील जलालपुरा, तलाव रोड आदी भागात राहणार्या बोहरा समाजबांधवांच्या घरीसुद्धा भेट देतील. त्यांच्या घरी होणार्या आगमनामुळे अनेकांनी घरावर सोबतच दुकानांवरही रोषणाई केली. १0 रोजी सकाळी मलकापूर मार्गे खामगावात आल्यानंतर स्थानिक गो.से. महाविद्यालयाजवळ स्वागत करण्यात येणार असून, तेथून मोटारसायकल रॅली काढून बोहरा मशिदीपर्यंंंत आणण्यात येणार आहे. त्यानंतर १0.३0 वाजता बोहरा मशीदमध्ये ते समाजबांधवांना उपदेशपर प्रवचन करतील. प्रवचनानंतर शहरातील बोहरा समाजबांधवांच्या घरी भेटी देतील. धर्मगुरू प्रथमच खामगावात येणार असल्याने परिसरातील अकोला तसेच इतर शहरातून सुमारे ३ हजार समाजबांधव या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सुख आणि शांतीचा संदेश देत इस्लामचा खरा अर्थ, सर्वधर्म समभावाची जोपासना, गरिबांना मदत, व्याजापासून दूर राहणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड, स्वच्छता आदींचे महत्त्व पटवून देण्यासाठी धर्मगुरू जगभर फिरत आहेत.
दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू बुधवारी प्रथमच खामगावात
By admin | Published: February 08, 2016 2:19 AM