बुलढाणा: नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेला एक युवक पुरात वाहून गेला.ही घटना १७ सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे घडली. वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला असून मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
देऊळगाव साखरशा येथील मासेमारीचा व्यवसाय करणारा सुनील रामदास कुकडे(३५) शनिवारी दुपारी तीन वाजता लेंडी नदीपात्रात मासेमारीसाठी गेला असताना त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला.याच दरम्यान नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने तो त्यामध्ये वाहून गेला.ही माहिती ग्रामस्थ आणि कुटुंबीयांना रात्री नऊ वाजता मिळाल्यानंतर त्यांनी नदीपत्रात जाऊन कुकडे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार आणि पडणारा पाऊस यामुळे शोध कार्यात अडचणी येत होत्या.त्यामुळे रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ग्रामस्थ आणि कुटुंबीयांकडून त्या युवकाचा शोध घेतल्या जात होता. सकाळी १० वाजता त्या युवकाचा मृतदेह उतावळी प्रकल्पात सापडला.
महसूलसह पोलीस विभाग घटनास्थळीसुनील कुकडे या युवकाच्या शोधासाठी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंधे यांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट देऊन शोधकार्यात येत असलेल्या अडचणीचा आढावा घेतला.यावेळी सरपंच संदीप अल्हाट यांची उपस्थिती होती. तर रविवारी महसूलचे तलाठी बालाजी माने, रवी काठे, मंडळ अधिकारी अनमोड यांच्यासह बीट जमादार प्रल्हाद टकले, विनोद फुफाटे आणि पोलीस पाटील गजानन पाचपोर,ग्रामपंचायत सदस्य रणजित देशमुख, बाळू वानखडे,शेख अबरार,रमेश पवार,तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम राठोड यांच्यासह इतरांनी त्या युवकाचा शोध लावण्यात मदत केली.
मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरूपुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह उतावळी प्रकल्पात शोध लागल्यानंतर ग्रामस्थ आणि महसूलचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रकल्पातून त्या मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत मात्र अद्यापही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नसल्याचे स्पष्ट होत आहे.