बुलढाणा : १९६ व्यवस्थापनांच्या वर्ग ६ ते १२ वीच्या शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी प्राधान्य क्रम भरण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत असताना त्यात एक दिवसाची वाढ करून २६ एप्रिलपर्यंत देण्यात आली हाेती. ही मुदत संपली असून, भावी शिक्षकांना आता निवड यादीची प्रतीक्षा लागली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर नोंदणीची प्रतीक्षाच आहे़.
सन २०१७ मध्ये घेण्यात आल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. १९६ व्यवस्थापनांच्या जागांसाठी प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले हाेते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे उमेदवारांना १३ एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान पुन्हा प्राधान्य क्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली हाेती. २५ एप्रिल राेजी उमेदवारांची संख्या पाहता, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २६ एप्रिल राेजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. त्यानंतर मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भावी शिक्षकांना आता निवड यादीची प्रतीक्षा लागली आहे.
नवीन भरतीला मुहूर्त मिळेना
राज्य शासनाने ३० हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची घाेषणा केली हाेती. त्यानुसार तातडीने फेब्रुवारी महिन्यात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर नाेंदणी सुरू हाेणे अपेक्षित हाेेेते. मात्र, २०१७ ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याने नवीन शिक्षक भरतीचा मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे.
१०० टक्के रिक्त जागा भराव्यात...
२०१७ मध्ये पहिल्यांदाच शिक्षकांची भरती अभियोग्यता चाचणीद्वारे करण्यात आली. त्यावेळी एकूण १२ हजार शिक्षक भरणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, केवळ ५ हजार जागा भरून पुढील प्रक्रिया बारगळली. त्यामुळे अनेक उमेदवारांचे नुकसान झाले. त्यानंतर आता २०२३ मध्ये पुन्हा शिक्षक भरतीसाठी अनेक उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिली असून, त्याचा निकालही जाहीर झाला आहे.
मात्र, २०१७ च्या भरती प्रक्रियेतच शासन अडकून पडल्यामुळे २०२३ ची भरती सध्या तरी थांबली आहे. त्यातच शिक्षणमंत्री केसरकर वारंवार सांगत आहेत की, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच जूनपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन ८० टक्के शिक्षक भरण्यात येतील. त्यामुळे भावी शिक्षकांच्या आशा वाढल्या असून, ८० ऐवजी १०० टक्के जागा भरल्यास अजून आनंद होईल, असे मत अभियोग्यताधारकांतून उमटत आहे.