लोणार : बाजार समिजी सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठई २७ मार्च रोजी आयोजित बैठक या पदांसाठी एकही अर्ज न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांना रद्द करावी लागली. शिवसेनेतंर्गत असलेल्या अंतर्गत वादामुळे हा तिढा निर्माण झाला असून दिल्लीवरून खासदार प्रतापराव जाधव परत आल्यानंतर या मुद्द्यावर काय तोडगा निघतो याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, सभापती, उपसभापतीपदाच्या निवडीसाठी आयोजित बैठकीची पुढची तारिख नेमकी कोणती राहील हे ही अद्याप स्पष्ट झालेले नाही. सभापती, उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीत जवळपास सहा जण इच्छूक असल्याने २७ मार्च रोजी चुरस वाढली होती. आपसी मतभेद दुर करण्यात त्यादिवशी अपयश आल्याने ही निवडणूकच रद्द करण्याची पाळी आली होती. लोणार बाजार समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. सभापती, उपसभापतीपदासाठी दोन गट आमने-सामने आल्याने येथील राजकारण सध्या तापलेले आहेत. परिणामी निवडणुकीच्या दिवशीच आमदार डॉ. संजय रायमुलकर, खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव मापारी, शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्यासोबत संचालकांची बैठक घेण्यात आली होती. मात्र बैठकीमध्ये शिवसेना तालुका प्रमुख प्रा.बळीराम मापारी यांनी सभापती पदासाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त करून आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचेही सांगितले होते. सभापती पदासाठी अनेक पदांचा अनुभवी उमेदवार उभा राहिल्याने निवडणुकीला एक नवीन राजकीय वळण त्यामुळे मिळाले होते. परिणामी मंगळवारी निर्धारीत वेळेत एकाचेही नामांकन न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा शितोळे यांना निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली होती. आता पुढील तारिख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागल्यामुळे शिवसेनेतंर्गतचे आपसी वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. तशी संचालकांमध्ये चर्चा आहे. बाजार समितीचा कारभार व्यवस्थित हाताळणारे शिवपाटील तेजनकर हे खा. प्रतापराव जाधव यांच्या मर्जीतले असल्याने त्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता असून तशी चर्चा आहे. सधी मिळाल्यास शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रयत्न करून बाजार समिती हायटेक करू असे तेजनकर यांचे म्हणणे आहे.