मलकापूर पांग्रा येथे महावितरणे ३३ केव्हीचे एक उपकेंद्र आहे. येथून गावात व कृषी पंपासाठी वीज पुरवठा केला जातो. ३३ केव्ही लाईनवरील एका पोलवर ‘जंपर’ तुटल्याने गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानुषंगाने सकाळी १० वाजता लाईनमन प्रशांत देशमुख आणि सहाय्यक सोनपसारे हे तेथे गेले . स्वतः प्रशांत देशमुख आणि सोनपसारे यांनी परवानगी घेऊन वीज खांबावर चढून तेथे झालेला बिघाड काढण्याऐवजी ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर श्रावण मांजरे यांना बोलावून मुख्य वाहिनीवरील दोष दुर करण्यासाठी खांबावर चढविले. मात्र त्या अगोदर ३३ केव्ही वीज उपकेद्रातून तशी रितसर परवानगी घ्यावयास हवी होती. परंतू परमीट घेतले असल्याचे सांगून त्यांनी विश्वंभर मांजरे यांना खांबावर चढविले. वीज खांबावर चढताच विश्वंभर मांजरे यांना विजेचा शॉक लागला आणि ते वीज खांबावरच गतप्राण झाले. हा घटनाक्रम निदर्शनास येताच प्रशांत देशमुख व सहाय्यक सोनपसारे यांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना गावा जवळच घल्याने नागरिकांचीही तेथे मोठी गर्दी जमली होती.
--जमाव संतप्त--
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि कर्मचाऱ्यांनी लगोलग घटनास्थळ गाठले. तेव्हा तेथे जमलेल्या जमावाने पोलिसांना घेराव घातल आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तो पर्यंत महावितरणचे उप अभियंता खान, कनिष्ठ अभियंत्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. जमावाचा रोष पाहाता उप अभियंता खान यांनी उपरोक्त घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर लगेच वरिष्ठांनी लाईनमन प्रशांत देशमुख आणि सोनपसारे यांना निलंबित केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
--सदोष मनुष्य वधाचा गुन्हा--
या प्रकरणी नंदू श्रावण मांजरे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी लाईनमन प्रशांत देशमुख आणि सहाय्यक सोनपसारे यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून लाईनमन प्रशांत देशमुख यास अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे हे करीत आहेत.