बुलढाणा : घाटबाेरी वनपरिक्षेत्रात मादी बिबट २७ जानेवारी राेजी रात्री मृतावस्थेत आढळला़ घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळावर धाव घेवून पंचनामा केला़ तसेच कुजत असलेल्या बिबट्याच्या प्रेताचे शवविच्छेदन केले़.
मेहकर तालुक्यातील घाटबाेरी वनपरिक्षेत्रांतर्गंत निंबा नियत क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मेळ जानाेरी गावातील ई क्लास जमीनीवर एक बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली़ २७ जानेवारी सायंकाळी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेतली असता मादी बिबट मृतावस्थेत आढळले़ या बिबटचा चार ते पाच दिवस आधी मृत्यू झालेला असल्याने प्रेत कुजत असल्याचे समाेर आले.
घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक बुलढाणा, वनपरिक्षेत्र अधिकारी घाटबाेर, वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बिबटच्या प्रेताचे शवविच्छेदन केले़ वैद्यकीय अधिकारी यांनी बिबटचा चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा तसेच मृत्यूचे कारण उपासमार असावी, असे सांगितले़ मृत शवाचे आवश्यक ते नमुने न्यायवैद्यक प्रयाेगशाळेत पाठवण्यासाठी घेण्यात आले़ बिबटच्या मृत्यूप्रकरणी वनरक्षक निंबा बिट यांनी वनगुन्हा जारी केला असून पुढील तपास सुरू आहे़