खामगाव: शहरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी खामगाव शहरात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शांती महोत्सवाच्या सांगतेनिमित्त शहराच्या विविध देवी मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवराज उर्फ नटवर सुरेश यादव या युवकाला सायंकाळी अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो मिरवणुकीतून बाहेर पडून एका शाळेत थांबला. तेथेच तो बेशुद्ध पडला. ही घटना त्याच्या सहकाऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर काही मित्रांच्या मदतीने त्याला शहरातील खासगी दवाखान्यात, त्यानंतर जलंब रोडवरील एका मोठ्या रूग्णालयात हलविले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी या युवकाला भरती करून घेण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविली. त्यानंतर युवकाला मृतावस्थेत खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले.
तेथे मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. तथापि, डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का पोहोचल्याने या युवकाचा मृत्यू झाल्याची चर्चा सामान्य रूग्णालय परिसरात होती. मृतक युवकाच्या पश्चात आई, दोन भाऊ आणि एक बहिण असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे सतीफैल भागात शोककळा पसरली आहे. युवकाच्या मृत्यूनंतर या भागातील विसर्जन मिरवणूक थांबविण्यात आल्याचे समजते.