दुसरबीड: जऊळका शिवारात बिट क्रमांक ५९० मध्ये सहा कबुतर मृतावस्थेत आढळून आले आहेत. या पक्षाचा मृत्यू बर्ड फ्ल्यू या आजारामुळे झाल्याची भिती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वन विभाग किंवा पशु वैद्यकीय विभागाकडून संबंधीत पक्षांची नमुने न घेताच विल्हेवाट लावण्यात आली आहे.
कबुतरांचा मृत्यू झाल्याची माहिती दुसरबीड गावामध्ये पसरताच बीबी बीटच्या वनरक्षकांना ही माहिती देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. मृत पक्षाचा पंचनामा करून वैद्यकीय तपासणी करिता पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावण्यात आले. ही कबुतरे मृत्यू पावण्याची नेमकी कारणे काय? हे मात्र अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. केराम यांना विचारणा केली असता पक्षीही कबूतर जातीचे असून कुणीतरी पाळलेले असावेत असे त्यांनी सांगितले. मात्र याप्रकारामुळे दुसरबीड परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.