बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये स्फोट होऊन एक विद्यार्थी जखमी झाला होता. त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी सकाळी स्कूलमध्ये त्याच्या मृतदेहासह ठिय्या दिला. दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने वातावरण तापले होते.राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये मंगळवारी दुपारी रूम नं. पाचमध्ये स्फोट झाला. या स्फोटात जनुना येथील पाचव्या इयत्तेतील आदिवासी विद्यार्थी निवृत्ती शालीग्राम चंडोल (११) हा जखमी झाला. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह जनूना येथे आणल्यानंतर संतप्त गावकरी मृतदेह घेऊन मिलिटरी स्कूलमध्ये आले व दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तथापि, पोलीस कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून अखेरीस गावकरी मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन गेले. (प्रतिनिधी)हा विद्यार्थी पेन्सिल सेलसोबत खेळत होता. घर्षण झाल्याने सेलचा स्फोट झाला. त्यातील पार्टीकल्स मुलाच्या शरीरात गेल्याने मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या नातेवाईकाने किंवा गावकऱ्यांनी तक्रार दिली तर आम्ही त्यानुसार कारवाई करू.- बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलडाणा.स्फोट होताच आम्ही मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यानंतर त्याला मुंबईला नेण्यात आले. - रवींद्र पडघान, मुख्याध्यापक, राजीव गांधी मिलिटरी स्कूल, बुलडाणा.
स्फोटातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: March 31, 2017 3:53 AM