बुलडाणा: शहरातील गवळीपूरा भागातून सोमवारी बेपत्ता झालेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे मृतदेह हे परिसरातीलच एका बंद कारमध्ये आढळून आले असून, चार वर्षिय मुलीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या प्रकरणात घातपाताचा कुठलाही संशय नसून बालकांचा मृत्यू हा अपघाती झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. परिणामी, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ पाटील यांनी केले आहे.येथील गवळीपूरा भागातून सोमवारी सहर शेख हमीद (वय ४), शेख अहिल शेख जमील (वय ५) व शेख अजीम शेख शामिर ( वय ३) हे सोमवारी दुपारी बेपत्ता झाले होते. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसात तक्रारही नोंदविण्यात आली होती. त्यानंतर घटनेचे गांभीर्य पाहता, बुलडाणा जिल्ह्यासह अमरावती परिक्षेत्रात संभाव्य शक्यता विचारात घेता नाकाबंदी करण्यात आली होती. नागपूर, मुंबई रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला होता. सोबतच बुलडाणा पोलीस दलातील डीबी स्कॉड, स्थानिक गुन्हे शाखा व यंत्रणांनी रात्रभर सर्च आॅपरेशन केले होते. त्यावेळी मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गवळीपूरा भागातीलच कारमध्ये (क्रमांक एच-एच- ०२- ए-क्यू-३८४२) ही मुले आढळून आली. त्यावेळी शेख अहिल शेख जमील व शेख अजीम शेख शामिर या दोघांचा गुदमरल्यामुळे कारमध्येच मृत्यू झाला. तर काहीशी शुद्धीत असलेल्या सहेरला पोलिसांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी व्यक्तिशा रुग्णालयात जाऊन तिची चौकशी केली. तिने दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा समोर आला असल्याचे पोलीस अधिक्षक म्हणाले.
बेपत्ता बालकांपैकी दोघांचा मृत्यू; मुलीची प्रकृती स्थिर: घातपाताचा प्रकार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:50 PM
चार वर्षिय मुलीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
ठळक मुद्दे बालकांचा मृत्यू हा अपघाती झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ पाटील यांनी केले आहे.