सिंदखेड राजा : जालना-सिंदखेड राजा मार्गावर शहरानजीक असलेल्या डोंगराच्या खोल खड्ड्यात दुचाकीस्वार पडून झालेल्या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यालगतच्याच वळणावर हा अपघात १६ मार्च रोजी झाला असताना ही घटनाच १९ मार्च रोजी उघडकीस आली. त्यामुळे तीन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह तब्बल तिसऱ्या दिवशी मिळाला. विशेष म्हणजे या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असतानाही हा अपघात नेमका कसा झाला व तो कोणाच्याही निदर्शनास आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाडी येथील गजानन संतोष भुजबळ हा दुचाकीवर १६ मार्च रोजी (एमएच-२१-बीजे-५९९१) सिंदखेड राजाकडे आला होता. मात्र तीन दिवसानंतरही गंतव्यस्थळी तो पोहोचला नाही. त्यामुळे त्याचा भाचा सदानद गजानन कुदळे (रा. नाव्हा) हा गजानन भुजबळ याच्या शोधात १९ मार्च रोजी निघाला होता. दरम्यान, सिंदखेड राजा टी-पाईंट नजीक असलेल्या डोंगरावरील वळणाजवळ त्याला दुर्गंधी आल्याने त्याने तेथे पाहणी केली असता तेथे गजानन भुजबळ यांचे पार्थिवच डिकंपोज स्थितीत दिसून आले. प्रकरणी त्याने सिंदखेड राजा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार संतोष नेमणार, पोलिस उपनिरीक्षक सुनील खेडेकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू घोलप, नंदलाल खारडे यांनी घटनास्थळीच पंचनामा करून सामाजि कार्यकर्ते बुद्धू चौधरी यांच्या सहकार्याने छोटेखानी दरीतून हे पार्थिव बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. सिंदखेड राजा नजीक एकांत धाब्या जवळ वळण रस्ता असून त्याच्या बाजूलाच ही दरी आहे.
संरक्षण भींत बांधणे गरजेचे
शहरा लगतच एकांत ढाब्यानजीक जालना मार्गावर वळण रस्ता असून बाजुलाच खोल दरी आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात होऊन काहींंना प्राण गमवावे लागले आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी संरक्षण भींत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान गजानन भूजबळ (३५) हा त्याच्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना या वळणावरून सरळ दरीत कोसळून ठार झाला असावा, असा पोलिसांचा कयास असून पुढील तपास ठाणेदार संतोष नेमणार करीत आहेत.