लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (जि. बुलडाणा): नोटाबंदीमुळे शेतकरी व सर्वसामान्य माणुस देशोधडीला लागला असून, यातून कोणाचा फायदा झाला ते आपल्याला माहित नाही; मात्र नोटाबंदीच्या या पापाची परतफेड शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीतून करावी लागल्याची बोचरी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. शेगाव येथे गुरुवारी आयोजित शिवसेनेच्या भव्य शेतकरी व पदाधिकारी मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. तत्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पुर्णत: अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही वेळोवेळी मांडत आलो पण त्याचे कधीही राजकारण शिवसेना करीत नाही. शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडते. हाच शिवसेनेचा पिंड आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे असे शिवसेनेच्या बाबतीत कधी होत नाही. शिवसेना विघ्नसंतोषी नाही, पाप करणाऱ्यांची औलादही शिवसेनेत नाही, शेतकऱ्यांचा विश्वासघात करून राजकीय पोळी शेकणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शिवसेनेने केले. ‘मी कर्जमुक्त होणारच’ या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या कर्जमुक्ती अभियानाचा अर्ज आज आपण ‘श्रीं’च्या चरणी ठेवला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...तर मुहूर्ताची वाट पाहणार नाही!सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली तर पाच वर्ष हे सरकार पडू देणार नाही. मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल त्याला कर्जमाफीची घोषणा करून दिशाभुल केली जात असेल तर शिवसेना राज्यात भुकंप घडवून आणेल. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर घाला!समृद्धी महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनीवर घाला घालण्याचा डाव आहे. यातून शेतकरी समृध्द नाही तर कर्जबाजारी होणार आहे. शेतकऱ्यांचे तुरीचे कोट्यावधीचे चुकारे अद्याप शासनाने दिले नाही. कर्जमाफीबाबतही शासनाचे मनसुबे खरे दिसत नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
कर्जमुक्ती ही नोटबंदीच्या पापाची परतफेड : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 8:11 PM