- ब्रह्मानंद जाधव लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होण्याचे संकेत आहेत. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. सुरक्षीततेची योग्य काळजी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे, निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या हालचाली काही जिल्हामध्ये सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याबाबत शासनाकडून स्पष्ट आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकही शाळा सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुणांसाठी बहुतांश शाळांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले होती. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, शाळांमध्ये विलगीकरण केंद्र नाहीत. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दीपावलीच्या सुट्टीनंतर सुरू होऊ शकतात. मात्र विद्यार्थी संख्या, बैठक व्यवस्था, उपस्थिती, तसेच वर्ग एक दिवस आड भरवावे की दररोज भरवावे, याबाबत अद्याप स्पष्ट सुचना नाहीत. सध्या शिक्षकांना दिवाळी सुटी असल्याने शाळा सुरू होण्याबाबत दिवाळीनंतरचा मुहूर्त निघू शकतो.
सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा धोका पुर्णत: टळला नाही. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुन्हा प्रशासकीय पातळीवर विचार होणे गरजेचे आहे. शहरी भागामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून येतणार असल्याने संक्रमणाची भीती आहे. - प्रशांत कानोडजे, पालक.