अंजनी येथे तीव्र पाणीटंचाई
मेहकर : तालुक्यातील अंजनी येथे गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणीटंचाईकडे गावपुढारी आणि सचिव दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून येथील पाणीटंचाई निर्मूलनासाठी प्रयत्न व्हावेत.
रोहयोच्या मजुरीत दहा रुपयांची वाढ
बुलडाणा : रोहयो योजनेत काम करणाऱ्या मजुरांना पूर्वी २३८ रुपये रोजगार दिला जायचा. आता यामध्ये आणखी दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे रोहयो मजुरांना २४८ रुपये रोजगार मिळणार आहे.
कोरोनामुळे आठवडी बाजार बंद
धामणगाव बढे : दिवसेंदिवस जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत. आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
३० गुंठ्यांत २० क्विंटल हळदीचे उत्पादन
साखरखेर्डा : येथील एका शेतकऱ्याने ३० गुंठ्यांत २० क्विंटल हळद आणि सहा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत केली तर शेती कशी परवडते, याचे उत्तम उदाहरण शेतकरी गजानन मंडळकर यांनी दाखवून दिले आहे.
विमा रक्कम देण्याची मागणी
बुलडाणा : कोरोना आपत्तीमुळे शासनाने पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी सुदेश गुलभेले यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
बँकांसमोरील गर्दी नियंत्रणात येईना !
बुलडाणा : विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी सामान्य नागरिकांची बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. प्रत्येक नागरिकाला पैसे मिळावे यासाठी बँकांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिक समजून घेत नसल्याने बँकांसमोरील गर्दी वाढतच आहे.
मेहकर तालुक्यात दहा विहिरींचे अधिग्रहण
मेहकर : मागील वर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे तालुक्यातील पेनटाकळी कोराडी प्रकल्पासह इतर लघु जलाशय तुडुंब भरले होते. मात्र, तरीही मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट कायम असून, पाणी टंचाईकरिता आजपर्यंत दहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
महागाई कमी करण्याची मागणी
सुलतानपूर : मागील काही दिवसांपासून बहुतेक सर्वच वस्तूंची दरवाढ झाली असल्याने महागाईचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, शासनाने मदत देण्याची मागणी हाेत आहे.
खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण
डोणगाव : डोणगाव ते मेहकर राज्य महामार्गावर असलेल्या हिवरा साबळे फाट्यावर माेठा खड्डा पडला आहे़ त्यामुळे अपघाताची शक्यता आहे़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी हाेत आहे़ डोणगाव येथून जवळच असलेल्या राज्य महामार्गावर हिवरा साबळे फाट्याजवळ गत काही दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे़ रात्री हा खड्डा दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे़