नीलेश जोशी, बुलढाणा: शहरातील शांतीनगरच्या मागील भागात असलेल्या खोऱ्यात बिबट्ट्याचा कुजलेल्या अवस्थेत ८ मे रोजी मृतदेह आढळून आला. या बिबट्ट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शहरालगतच्या भागातच ही घटना घडल्याने याबाबत गुढ वाढले आहे.
बुलढाणा शहरातील शांतीनगरच्या मागील भागात वनपरिक्षेत्रातील हनवतखेड बीट मधील कंपार्टमेंट क्रमांक ५२२ आहे. या भागात खोऱ्यात गस्तीवर असलेल्या वनरक्षक दीपक घोरपडे यांना बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी वरिष्ठांना त्याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी रणजीत गायकवाड, आरएफअेा अबिजीत ठाकरे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. बुलढाणा पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त डॉ. आर. बी. पाचरणे, डॉ. जी. एम. जाधव यांनाही घटनास्थली बोलविण्यात आले. त्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. तसचे बिबट्याचे पार्थिव त्यानंतर तेथेच जाळून नष्ट करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अध्याप तरी गुलदस्त्यात आहे. या घटने प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती बुलढाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी दिली.
शहरालगत बिबट्याचा मृत्यू
बुलढाणा शहरातील जिल्हा क्रीडा संकुल, बालाजी नगर, खालीद बिनवलीद नगर, शांतीनगर, मिर्झा नगर हे अजिंठा पर्वतरांगेच्या काठावर वसलेले आहे. मागील काही महिन्यापासून या भागात अनेकदा बिबट्या नागरिकांना दिसला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. आता या भागालगतच बिबट्ट्याचा मृतदेह आढलून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.