मेहकर : तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामावर अँपको कंपनीचे गिट्टी क्रशर मशीन सुरू असल्याने या क्रशरमधून धूळ मोठ्या प्रमाणात निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी; अन्यथा सदर काम बंद पाडण्यत येईल, असा इशारा फर्दापूरचे सरपंच मदन गाडेकर व इतर शेतकऱ्यांनी दिला आहे.
मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असून, या तक्रारीचा खच पडला आहे. फैजलापूर येथे समृद्धी महामार्गचे काम चालू असून, येथे अँपको कंपनीच्या गिट्टी क्रशर मशीनचा प्लांट चालू आहे. त्यामुळे धूळ निघत असल्यामुळे फैजलापूर शिवारातील पिकांचे, तसेच फळबागांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. या धुळीमुळे सोयाबीन, तूर, हरभरा, गहू वा फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नुकसानास अँपको कंपनी जबाबदार आहे. शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसानभरपाई देण्यात यावी; अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असे पत्र तालुका कृषी अधिकारी व महसूल विभागाला दिले आहे. यावेळी फर्दापूरचे सरपंच मदन गाडेकर, सखाराम पांडुरग बोडखे, देवीदास पांडुरग बोडखे, विजय पुंडलिक गाडेकर, दामूअण्णा गाडेकर, मनोज खरात, बोडखे, रमेश गाडेकर, विजय संतोषराव गाडेकर, संजू गोविंदराव गाडेकर व इतर शेतकरी उपस्थित होते.
तक्रारी निकाली काढण्यास विलंब
धुळीमुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. याकरता कृषी व महसूल विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली काढायला हव्यात. मात्र, या तक्रारी निकाली काढण्याकरता विलंब होत आहे. सदर कंपनीचे काम पूर्ण झाल्यावर या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न निर्माण होत आहे.
आमच्या मालकीची असलेल्या जमिनीजवळून समृद्धी महामार्ग गेला आहे. यावर क्रशर मशीन असल्याने धुळीमुळे हरभरा पिकाचे खूप नुकसान होत आहे. सदर धुळीचे नियोजन करून नुकसानीचा मोबदला देण्यात यावा.
-देवीदास बोडखे, शेतकरी, फर्दापूर